मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित मनमाड येथील महर्षी वाल्मिकी क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची रविवारी भक्तिमय वातावरणामध्ये काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली.
या कीर्तन सोहळ्याला मनमाड शहर आणि पंचक्रोशीतील भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला दररोज या सोहळ्यासाठी 4 ते 5 हजार भाविक उपस्थित राहुन दररोज सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकरांच्या किर्तनांची पर्वणी ही भाविकांना लाभत होती.
4 मे पासुन सुरवात झालेल्या या सोहळ्याचा शुभारंभ हा श्री क्षेत्र पैठण येथुन मनमाड पर्यंत पायी आणलेल्या नाथज्योतीच्या भव्य स्वागत यात्रेने करण्यात आली.या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायातील ख्यातनाम असणाऱ्या कीर्तनकार मंडळींच्या किर्तनांची आणि प्रवचनाची पर्वणी रोज सकाळी आणि सायंकाळी भाविकांना प्राप्त होत होती तसेच दोन्हीही वेळेला भाविकांना पिठल-भाकर पासुन ते खीर-मांडे पर्यंत विविध प्रकारच्या पदार्थांची मेजवानी ही भाविकांना मिळाली.या सोहळ्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणुन रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.
शहरात झालेल्या या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशा अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्याची सांगता ही प्रसिध्द कीर्तनकार आणि विश्व हिंदु परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष हभप श्री एकनाथ महाराज सदगीर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.